नरेंद्र मोदी का नकोत?
नरेंद्र मोदींना प्रचार समितीचे प्रमुख केल्यानंतर लगेच थोड्या दिवसात
त्यांना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित केले. मोदींनी हळू हळू प्रचार सभांचा धडाका सुरु केला. थोड्याच
दिवसात देशात मोदीलाट आलेली आहे म्हणून गाजावाजा सुरु झाला. मग निवडणुकीच्या
निकालाची भाकिते वर्तवली जाऊ लागली. तिथे भाजप व रालोआ यांच्या आकड्यांचा आलेख सतत
वाढत असलेला दिसू लागला. मोदी मोदी म्हणून एवढा धोशा लाऊनही मिशन २७२+ काही
सव्वादोनशेच्या पुढे पार होताना दिसत नाही. खुद्द मोदींचीही
फक्त ३०० तरी कमळे फुलायला हवीत,
अशी माफक अपेक्षा
आहे. जबरदस्त मोदीलाट आलेली आहे अशी जोरदार हाकाटी मारूनही हे असं निराशाजनक चित्र
का दिसत आहे?
मोदी
तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, हे फार महत्वाचे
ठरू शकत नाही. कारण इतरही कितीतरी नेत्यांच्या कारकिर्दी याहूनही सरस आहेत. आणि
गुजरातच्या विकासाचा जो डंका वाजवला जातो तोही हळू हळू फार दमदार नाही हे उघड होत
आलंय. गुजरात हे इतर कितीतरी राज्यापेक्षा फार मागे आहे, हे
आकडेवारीनिशी कितीतरी वेळा सिद्ध करण्यात आलंय.
मग मोदींचा हा एवढा उदो उदो का? त्यांचं असं काय
खास वेगळं कर्तृत्व आहे ज्यामुळे आज नको त्या प्रमाणात त्यांना प्रसिद्धी दिली
जातेय?
गुजरातमध्ये
२००२ साली जे मुस्लिमांचे सुनियोजित हत्याकांड घडवून आणले गेले
त्याची सर्व जबाबदारी नरेंद्र मोदी यांचेकडेच जाते. त्यावेळी जे माणुसकीला काळिमा
फासणारे अनन्वित अत्याचार केले गेले, ते सरकारी यंत्रणेच्या पाठींब्याशिवाय
शक्य झाले नसते. यावर मोदी यांची टिप्पणी काय तर ''क्रियेला
प्रतिक्रिया ही असतेच.'' आपल्या राज्यातील इतके निरपराध लोक, ज्यात मुख्यत्वे स्त्रिया आणि बालके
यांचा समावेश होता, मारले जातात तेंव्हा एक मुख्यमंत्री म्हणून
मोदींना कधीही पश्चात्ताप झालेला नाही. अगदी अलीकडे जेंव्हा त्यांचे
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव घेण्यात येऊ लागले तेंव्हा त्यांनी दिलेल्या
मुलाखतीतही त्यांनी ''कुत्र्याची पिल्ले'' अशी
मुस्लीमाविषयी शब्दयोजना केली होती. त्यांचा प्रतिप्रश्न होता, ''कुत्र्याचे पिलू'' गाडीखाली आले तर वाईट वाटणार नाही का? ही तुलना त्यांचा मुस्लीमाविषयी असलेला
तुच्छताभाव दाखवते. म्हणजे ११/१२ वर्षानंतरही त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही. आणि
पुढेही पडणार नाही. सर्व
प्रसार माध्यमातून यावर चर्वित-चर्वण करण्यात आलं; पण त्या मुलाखतीतील मोदींच्या एका अतिशय विवादास्पद विधानाकडे
साऱ्यांचंच दुर्लक्ष झालं. त्यांना विचारण्यात आलं होतं की ''अजूनही पुष्कळ लोक २००२च्या दंगली आणि
तुमचा संबंध जोडतात, हे
तुम्हाला निराशाजनक वाटत नाही का?"
तर त्यावर त्यांचं उत्तर होतं, "लोकांना टीका करण्याचा अधिकार आहे. आपला
लोकशाहीप्रधान देश आहे. प्रत्येकाला त्याचे मत आहे. जर मी काही चुकीचे केले तर मला
अपराधी वाटेल. निराशा तेंव्हा येते जेंव्हा तुम्हाला वाटते, 'मी पकडला गेलो. मी चोरी करत होतो आणि
पकडला गेलो.' पण
माझी स्थिती तशी नाही.'' सर्वांनी
त्यांच्या या स्पष्टीकरणाकडे साफ साफ का दुर्लक्ष केलं? त्यांना काय सूचित करायचंय? दंगली झाल्या, माणसे मेली, घरे-दारे
जाळली गेली, बलात्कार
झाले, सामुहिक
बलात्कार झाले, अमानुष
अत्याचार झाले, शेकडो
प्रार्थना-स्थळे उध्वस्त केली गेली ....... सगळं ठीक आहे. पण मी पकडलाच गेलो नाही
तर मला का वाईट वाटावे? मला
का निराशा येईल? इतकं अजब तर्कशास्त्र ज्या माणसाचे आहे
तो पंतप्रधानपदाला लायक कसा? याचं उत्तर भाजपकडे नाही. कारण मोदींना
''वरून'' थोपण्यात आलंय.
इतर पुष्कळ संघटनाबरोबरच, लोकांना मूर्ख समजून ते कितीही नाकारत
असले तरी, भाजप हीसुद्धा संघाचीच संघटना आहे. पण यावेळी
मोदींना प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नेमण्यापासून ते त्यांना पंतप्रधानपदाचे
उमेदवार म्हणून घोषित करण्यापर्यंत संघाने जशी उघड उघड जबरदस्ती केली तसं पूर्वी
कधीच पाहण्यात आलं नव्हतं. यात भाजपच्या कितीतरी नेत्यांची जी ससे-होलपट झाली ते
फारच केविलवाणे दृश्य होते. परत मोहन भागवत सांगतात यामध्ये संघाचा काहीच संबंध
नाही. आणि राजनाथ सिंग त्यांचीच री ओढतात. यांनी कितीही लोकशाहीच्या गप्पा
मारल्या आणि सोज्वळतेचा आव आणला तरी यांचं मूळ स्वरूप लपून रहात नाही. तरीही
त्यांच्या अभिनयाची वाखाणणी केलीच पाहिजे.
गोबेल्सनीतीला अनुसरून सतत धादांत असत्य बोलत राहिलं तर लोकांना ते खरेच
वाटेल, या त्यांच्या
आत्मविश्वासाला खरोखरच दाद दिली पाहिजे.
संघाने गुजरातचा
एक प्रयोगशाळा म्हणून वापर केला हे सर्वांनाच
माहित आहे. फार पूर्वीपासूनच जातीय द्वैष पसरवण्याचे काम संघ गुजरातमध्ये करत
होता. रामभूमी आंदोलनामुळे संघाला हा जातीय विद्वैश मोठ्या प्रमाणावर पसरवता आला.
काही प्रमाणात ख्रिश्चन लोकांना लक्ष्य केलं तरी मुख्य भर मुस्लिमाविरुध्द
हिंदूंच्या मनात विष कालवण्यावरच होता. त्याकरता महमद गजनीने सोमनाथ मंदिराची
केलेली लूट आणि तत्सम इतिहासातील मढी उकरून लोकांना चिथावण्याचे काम पध्दतशीरपणे सुरू होते.
जमावाने फोडलेल्या मुस्लिम दुकानातील माल तथाकथित मध्यम-वर्गीय बायका राजरोसपणे
लुटताना दिसत होत्या, बाबू
बजरंगीसारखे गुंड गर्भवती स्त्रीचा गर्भ तलवारीने बाहेर काढून तलवारीच्या टोकावर
गर्वाने नावचतो. मोदी
काय किंव्हा संघ काय याविषयी कधी चकार शब्दाने बोलले आहेत? उलट असं म्हणतात की मोदींनी बजरंगीला
सर्वतोपरी पाठबळ दिलं. यावरून विद्वैशाचे विष किती खोलवर भिनलं आहे याची कल्पना
येऊ शकते. इकडची
तिकडची चार टाळकी काहीही बोलली किंव्हा कसंही वागली तरी व्यापक मुस्लिम समाज
मोदींना कधीच माफ करणार नाही. गोध्राकांड हे फक्त निमित्त होते; एरव्हीही मुस्लिमांना नेस्तनाबूत
करण्याकरता त्यांचे हत्याकांड घडवून आणलेच असते. संघाची ती गुजरातपुरती योजना होती
आणि आता हाच कार्यक्रम त्यांना राष्ट्रीय स्तरावर राबवायचा आहे. देश
राज्यघटनेप्रमाणे चालतो, चालेल
हे वक्तव्य म्हणजे सैतानाच्या तोंडी बायबल म्हणावे लागेल. मुस्लिमसमाज तरी
त्यांच्या या भूलथापावर विश्वास ठेऊ शकत
नाही.
मोदींची मुख्यमंत्री म्हणून जी काही १२/१३
वर्षाची कारकीर्द आहे त्यात त्यांनी आपलं गुजरातचा एकमेव नेता म्हणून स्थान बळकट
केलं आहे. त्यांनी सर्व प्रतिस्पर्ध्याना नामोहरम केलं आहेच पण त्यांनी स्वत:च्या
पक्षातही सर्वाना गुंडाळून ठेवलं आहे. संघाला जसा हवा आहे तसा हुकुमशाही वृत्तीचा नेता नरेंद्र मोदी
आहेत. गुजरातमध्ये जेवढं हवं आहे तेवढं राज्यनिर्मित भय तयार केल्यानंतर आता तोच
प्रयोग राष्ट्रीय पातळीवर करून पाहण्याकरता मोदींना राष्ट्रीय स्तरावर पदोन्नत
करणं आवश्यक होतं. संघाकरता ही वेळ म्हणजे ''आत्ताच किंव्हा नंतर कधीच नाही'' अशी आहे. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे लोकामध्ये
जी काँग्रेसविरोधी भावना निर्माण झालीय तिचा पुरेपूर फायदा उठवण्याची हीच वेळ आहे, हे संघाच्या चतुर नेतृत्वाने जाणलं
आहे. अजून पूर्णपणे 'क्लीन
चीट' मिळण्याकरता
काही वर्षे जावी लागतील. बाकीचीही कारस्थानं, कुलंगडी बाहेर येण्याअगोदर सत्ता काबीज करणं आवश्यक आहे. एकदा का
पंतप्रधानपद ताब्यात आलं की भूतकाळातील सर्व भूते कायमची गाडता येतील. जागतिकीकरणाच्या
रेट्याखाली सामाजिक, आर्थिक
संबंधात ताण-तणाव निर्माण होत आहेत. देशाचा जसा हवा तसा विकास होत नसल्यामुळे
भविष्यात प्रचंड जनविक्षोभ येऊ घातलेला आहे. त्यातून वेगळीच पुरोगामी राजकीय
समीकरणे निर्माण होतील जी संघाला सोयीस्कर असू शकणार नाहीत. गोळवलकरगुरुजी ते
भागवतगुरुजीपर्यंत जे ''विचारधन'' चालत आलं आहे ते पूर्णपणे गंगार्पण
होईल. संघाकरता हा आता अटीतटीचा लढा आहे.
पण भारतीय जनतेचं काय? काही काळ मुस्लिम जात्यात भरडले जातील
पण बाकीचे सर्व सुपात आहेत, त्यांचं
काय? हिंदूमधील एक वर्ग हा पूर्णपणे
सर्वधर्मसमभाव मानणारा, सामंजस्याने
राहणारा आहे. अगदी ९२/९३ पर्यंत हे दोन्ही समुदाय एकोप्याने राहत होते. पण दोन्हीकडेही विद्वैश फैलवणाऱ्या
शक्तींनी आपली पाळे-मुळे पसरवल्यामुळे समजात प्रचंड दुफळी निर्माण झाली आहे.
हिंदूमधील जो एक वर्ग अजून अनिर्णयी अवस्थेत आहे, संघाच्या प्रचारामुळे त्याच्या मनात मोदीविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. देशासमोरचा हा सर्वात मोठा धोका आहे.
त्यानां वस्तुस्थितीची जाणीव करून देणं आवश्यक आहे. भारतीय जनतेसमोरचं नरेंद्र
मोदी हे एक मोठं संकट
आहे.
संघाप्रमाणेच भारतीय जनतेकरताही ही वेळ ''आताच किंव्हा कधीच नाही'' अशीच आहे. गुजरातमधील वंझारा, शर्मा, भट असे कितीतरी आयपीएस, आयएएस अधिकारी राज्यानिर्मित भयाशी त्यांचा फार ‘घनिष्ठ’
संबंध येउनही मोदींच्या उघडपणे विरोधात गेले आहेत. देशात गुजरात हे असे एकमेव
राज्य असेल की जिथले प्रशासनातील एवढे उच्चाधिकारी तिथल्या मुख्यमंत्र्याच्या
अरेरावीपूर्ण, बेकायदेशीर, घटनाबाह्य वर्तनाचे सतत वाभाडे काढत
आहेत. या गुजरात 'मॉडेल'ची मात्र कोणी कशी काय चर्चा करत नाही?
भारतातील मतदार आता पुष्कळच शहाणा झालेला आहे. त्याला या सर्व गोष्टी
समजतात आणि उमगतातही.
तरीही प्रसंग आणिबाणीचा आहे.
आता निवडणूका जवळपास संपत आल्या आहेत. वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात गेलं
आहे, हे निकालानंतरच
स्पष्ट होईल. जर मोदी पंतप्रधान झाले तर येणाऱ्या कित्येक वर्षात देशाला घनघोर संकटाशी
सामना करत रहावं लागणार आहे,
एवढीतरी जाणीव होणं आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment